औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूरमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. ही दहशत कुणा गुंडाची नाही तर ही दहशत आहे, गावात आलेल्या अज्ञात अळ्यांची. गावातल लोकांनी कधीही न पाहिलेल्या अळ्यांनी गावाला वेढा घालता आहे. त्यामुळं गावकरी कमालीचे घाबरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद जिल्ह्यातलं हे वजनापूर गाव. या गावातल्या सध्या कुठंही जा. ठिकठिकाणी तुम्हाला या अळ्या सापडतील. पिवळसर रंगाच्या या अळ्या एकमेकांना धरून चालतात. अळ्यांचा समुह सरपटणाऱ्या सापासारखा दिसतो. क्षणात तो ऑक्टोपसच्या आकाराचा दिसतो. ५ ते १०० फुटांपर्यंत या अळ्यांची रांग दिसते. घराच्या अंगणात, गोठ्यात कुठंही तुम्ही या अळ्या पाहू शकता. अनेकांच्या घरातही अळ्यांनी घुसखोरी केली आहे. गावात अशा प्रकारच्या अळ्या कधीच पाहिल्या नसल्याचं गावकरी सांगतात. या अळ्यांमुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


काही गावकरी अळ्यांवर रॉकेल आणि पेट्रोल टाकून त्यांना पळवण्याचा प्रयत्न करतायत. अळ्या बुरशीवर्गातल्या असल्याचं जाणकार सांगतात.


अळ्यांचं लयबद्ध चालणं आणि त्यांची संख्या पाहून गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय. इतर अळ्यांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या या अळ्यांमुळे गावकऱ्यांच्या मनात भीती घर करून राहिली आहे.