Coronaचा धोका असतानाही कोकणातील `या` ठिकाणी परदेशी पर्यटकांचा वावर सुरुच
संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विदेशी पर्यटकांना मज्जाव असताना देखील रेडी येथील यशवंत गडावर विदेशी पर्यटकांची रेलचेल सुरुच आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती वाढली आहे.
संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदेशी पर्यटकांना बंदी घातलेली असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे असणाऱ्या रेडी गावातील यशवंत गडावर विदेशी पर्यटकांची रेलचेल आतासुद्धा पहायला मिळत आहे.
गोव्यापासून जवळ असल्यामुळे रेडी येथे पर्यटक आवर्जून भेट देतात. विदेशी पर्यटकांना यशवंत गड कायमच भुरळ घातल असतो. यशवंत गडावरुन रेडीला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचंही दर्शन होतं. शिवाय येथील निसर्गाचं मनमोहक रुप पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतं. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक याठिकाणी आवर्जून भेट देत असतात.
पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष
दररोज किमान दहा ते पंधरा विदेशी पर्यटक हजेरी लावतात. भारत सरकारच्या पुरातन विभागाने हे पर्यटन स्थळ कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही पर्यटकांसाठी खुलं ठेवलं आहे अशी माहिती पुरातत्व विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र यशवंत गडाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो ही बाब नाकारता येत ऩाही. सध्या या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणतीही शासकीय आणि आरोग्य यंत्रणा कार्यन्वीत नसल्याचंच स्पष्ट चित्र दिसत आहे.