अमित शहांना 2029 मध्ये हवंय शुद्ध कमळाचं सरकार, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?
Amit Shah on BJP independent: अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.
Amit Shah on BJP independent: महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच महायुतीचं टेंशन वाढलंय. कारण मुंबईत अमित शाहांनी मोठं विधान केलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी अमित शाहा मुंबईत आले आहेत.. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीसाठी कानमंत्रही दिलाय. 2024 मध्ये महायुतीचं सरकार येणार असंही शाह म्हणाले आहेत. मात्र त्याचवेळी अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुंबईतल्या भाषणात सर्वात मोठं विधान केलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतले भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. आणि हाच संवाद साधताना अमित शाहांनी महत्त्वाचं विधान केलंय.
स्वबळावर भाजप सरकार आणण्याचा नारा
जे सरकार बनवतो तेच निवडणुक जिंकतात. आपण केंद्रात सलग तिसरं सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका, कोणताही सर्व्हे वगैरेचा विचार करू नका. यंदा 2024 ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपाचे सरकार आणायचे आहे. असा नारा अमित शाहांनी दिला. स्वबळावर भाजप सरकार आणायचं आहे हा नारा अमित शाहांनी एकदा नाही तर दोनदा दिला.
महाराष्ट्रात काय होणार?
झारखंड किंवा हरियाणामध्ये काय होणार हे मला विचारलं जात नाही. तर महाराष्ट्रात काय होणार असा प्रश्न सर्व जण मला विचारतात. असं अमित शाहा म्हणाले.. त्यानंतर आज महाराष्ट्रात काय होईल? असा प्रश्न अमित शाहांनी कार्यकर्त्यांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांनीही महाराष्ट्रात आपणच जिंकणार असं उत्तर अमित शाहांना दिलं. त्यानंतर अमित शाहांनी आपलं सरकार बनणार का असा प्रश्न विचारला. तेव्हाही कार्यकर्त्यांनी आपलं सरकार नक्की बनणार असं उत्तर दिलं.
अंतर्गत मतभेद मिटवण्याचीही तंबी
अमित शाहांच्या विधानामुळे भाजपची एकट्याच्या बळावर सत्तास्थापन करण्याची महत्त्वकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अमित शाहांनी कार्यकर्त्यांना अंतर्गत मतभेद मिटवण्याचीही तंबी दिलीय.. भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत दिखावा करणाऱ्या आमदार आणि नेत्यांनाही शाहांनी खडसावलंय...काम करताना वाद होतच असतात मात्र हे अंतर्गत वाद मिटवता आले पाहिजेत. ज्या संघटनेत मतभेद असतात, ती संघटना कधीच यशस्वी होत नाही. तेव्हा सर्वात आधी निवडणुकीपूर्वी मतभेद दूर करायचे आहेत असा सल्ला अमित शाहांनी दिलाय.
भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?
महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे.. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भाजपसोबत आहेत.. महायुती म्हणून 2024 च्या निवडणुकीला सामोरं जाणार असंच महायुतीचा प्रत्येक नेता म्हणतोय. मात्र त्याचवेळी अमित शाहांनी 2029 साठी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार? अमित शाहांच्या स्वबळाच्या विधानाचा नेमका अर्थ काय असे अनेक सवाल सध्या उपस्थित होतायत.