मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमित शहा येत्या ९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येत आहेत. या बैठकीत ते पुणे, बारामती आणि शिरुर या तीन मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लोकसभा निवडणुकीसाठी एक एक जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आजारपणातून उठल्यावर लगेचच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. एकीकडे शिवसेनेची युती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी युती नाही झाली तरी स्वबळावर जास्त जागा आणण्यासाठीही व्यूहरचना करण्यात येते आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शहा काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर ते कोल्हापूरलाही येणार होते. पण दरम्यान त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अमित शहा पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभेसाठी गेले होते. आता ते ९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी बुथ प्रमुखांचा मेळावा घेणार असून, त्यांना आगामी निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. 


पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे गेल्यावळी निवडून आले होते. यंदाही युती झाली तरी हा मतदारसंघ भाजपकडे राहणार आहे. बारामती हा पवार कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पण गेल्यावेळी महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. यावेळी या मतदारसंघात भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघ युतीच्या वाटणीमध्ये शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही भाजपची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे असेल.