सातारा: भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यात खासदार अमोल कोल्हे यांना अपयश आले आहे. अमोल कोल्हे यांनी सोमवारी सातारा विश्रामगृहावर उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. ही भेट मैत्रीपूर्ण होती. मी साताऱ्याला आल्यावर नेहमीच महाराजांना भेटतो. महाराजांसारखी व्यक्तिमत्व स्वयंभू असतात. त्यामुळे आपण काय निर्णय घ्यायचा, हे त्यांना चांगल्याप्रकारे कळते, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे समजले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात आली तेव्हा उदयनराजेंनी याठिकाणी उपस्थित राहणे टाळले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार फोन करूनही उदयनराजेंनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी अखेर सातारा विश्रामगृहावर उदयनराजेंना गाठले . सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. यानंतर उदयनराजे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, अमोल कोल्हे उदयनराजेंचे मन वळविण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.


उदयनराजे सोलापुरातील भाजपच्या मेगा भरतीत पक्षांतर करतील, अशी शक्यता होती. मात्र, अद्याप त्यांचा निर्णय झालेला नाही. उदयनराजे यांनी रविवारी आपल्या समर्थकांची एक बैठकही बोलावली होती. या बैठकीत उदयनराजेंनी म्हटले होते की, जे काही होईल ते लोकांच्या हिताचे होईल. माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांना मी विचार करून निर्णय घ्या, असे सांगितले होते. गेली २५-३० वर्षे हे लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.