अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावतर : अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली असून कायदा-सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. अमरावती शहरात पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले आहे. चारा बाजार परिसरात दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गट समोरासमोर आले. तेव्हा जुबेर सलीम पठाण या युवकावर काही लोकांनी तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभारी जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. 


दोन्ही गटातील अनेक जण रस्त्यावर उतरले होते. दोन गटात हाणामारी सुरू झाली असताना एका व्यक्तीने गोळीबार केला. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात असणारी उर्दू असोसिएशन शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्यामुळे गोळीबारात शाळेतून घराकडे जात असलेल्या तेरा वर्षीय चिमुकलीच्या पायाला गोळी लागली. 


या गोळीबारात ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या शाळकरी चिमुकलीला रुक्मिणी नगर परिसरातील डॉक्टर सावदेकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सावदेकर रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी उसळली असून, या ठिकाणी पोलीसांचा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे.