लस घेतल्यानंतर 25 जणांना झाला कोरोना, अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या २० ते २५ जणांना कोरोना झाला. तर २१४ जणांना लसीची रिअॅक्शन झाली आहे.
अमरावती: कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या २० ते २५ जणांना कोरोना झाला. तर २१४ जणांना लसीची रिअॅक्शन झाली आहे. त्यांना अंगदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुठे घडला हा सगळा प्रकार आणि कोरोनाची लस घेतल्यानंतरही असं का घडतं आहे जाणून घेऊया.
१६ जानेवारीपासून इथे कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. लस दिल्यावर २० ते २५ कर्मचा-यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २१४ लोकांना लसीची रिअॅक्शन झालीय. आरोग्यमंत्र्यांनी मात्र याबद्दल विशेष माहिती नसल्याचं सांगितलं आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनाही कोरोनाची लस घेतली होती. पण त्यांनाही कोरोना झाला.
कोरोनाची लस घेतल्यानंतरही शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जवळपास तीस दिवस लागतात, त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही खबरदारी घेण्याची गरज आहे.
पुढच्य़ा काही काळात सर्वसामान्यांनाही कोरोनाची लस दिली जाईल. मात्र लस घेतली की आपल्या जवळ कोरोना फिरकणारच नाही, असं समजून गाफील राहू नका. लस घेतली तरी काळजी घ्या
अमरावती जिल्ह्यात या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मोझरी, गुरुदेवनगर व अनकवाडी येथे आठवडी बाजार आणि हाथगाडी बंद ठेवण्याचे प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात आज सकाळपासून आढळले 359 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आढळले 23835 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण सापडले. आतापर्यंत 22630 कोरोना बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात केली आहे. सध्या 778 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.