अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : खरिपाचा हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांना अजून पर्यंत पीककर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यातच बँकेकडून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कागदपत्रंही मागण्यात येत आहेत. त्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगांव पेठ येथील बँकेमध्ये भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांना जास्तीचे कागदपत्र मागू नये असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना बँकेकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत कागदपत्र मागण्यात येत आहे आणि आम्हला जिल्हाधिकारी यांचे पत्र माहित नाही असे म्हणताच अनिल बोंडे यावेळी चांगलेच संतापले. आता शेतकरी फास घेणार नाही, तर हा फास तुमच्या गळ्यात टाकू असा ईशारा त्यांनी बँक शाखा प्रबंधकाला दिला.


एकीकडे राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांचे बँकेला आदेश असूनसुद्धा अनेक बँका या नं त्या कारणाने शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विदर्भातील शेतकऱ्यांना तीस टक्क्यांहूनही कमी कर्ज मिळाले आहे. जे शेतकरी जुने कर्जधारक आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले तरी त्यांच्याकडूनही नवीन कर्जासाठी कागदपत्रे मागितली जात आहेत ही बाबही यावेळी बोंडे यांनी अधोरेखित केली.



अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी अनिल बोंडे यांच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी या बँकेवर धडक दिली. शेतक्यांसमवेत नांदगाव पेठ येथील युनियन बँकेत धडक देत तेथील व्यवस्थापकाला त्यांनी घेराव घालत, शेतकऱ्यांना जर कर्ज मिळालं नाही तर नेमके परिणाम काय होतील याबाबतचा इशारा दिला.