अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये मंगळवारी एका भरधाव कारने तिघांची चिरडून हत्या केल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील तिघांची शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गाडीने चिरडून हत्या केल्याचे म्हटलं जात होतं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पूर्ववैमन्यसातून एका वृद्ध जोडप्याची आणि त्यांच्या सुनेची आरोपीने मिनीव्हॅनद्वारे हत्या केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नाचोना गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता शेजारी असून त्यांच्यात वाद झाला होता. वादानंतर पीडित त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर उभे असताना आरोपीने त्याची मिनी व्हॅन त्यांच्यावर चढवली. मृतांमध्ये 70 वर्षीय पती, त्याची 67 वर्षीय पत्नी आणि 30 वर्षीय सून यांचा समावेश आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


एका कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने चिरडून तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.  या घटनेने दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे.


शेजारच्या घरातील कोंबडी कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून अंगावर कार चढवून तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपअधीक्षक विक्रम साळी यांनी दिली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अनुसया अंभोरे, शामराव अंभोरे, आणि अनारकली गुजर यांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात रात्री आठच्या सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला. फिर्यादी किशोर आंबवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये भादवि कलम 302, 307, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी शेजारीच राहत होते. कुत्र्याने कोंबडी खाल्ली या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने त्याच्या चारचाकीने फिर्यादीचे आई वडील आणि एका महिलेला चिरडले. तिघांचाही मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांनी दिली.