अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहगाव फाटा येथे आयशर ट्रक व टाटा एस वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झालेत. सोमवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सिंदखेडराजा येथे एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात पाच जणांचा जीव गमवावा लागण्याची घटना ताजी असतानाच आणखी पाच जणांचा अमरावतीमध्ये मृत्यू झालाय. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर (daryapur) येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरावतीमध्ये दर्यापूर - अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण टाटानगर बाबडी येथील राहणारे असून एका लग्नावरुन ते परतत होते. मृतांमध्ये 2 लहान मुले, 2 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.


लग्न आटोपून हे कुटुंब टाटा एस या वाहनाने दर्यापूरकडे येत होते. त्यावेळी भरधाव असलेल्या आयशर ट्रकनेत वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत टाटा एसमधील 12 जण गंभीर जखमी झाले. त्यातल्या दोन जणांचा तर जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर लोकांनी जखमींना दर्यापूर येथे रुग्णालयात दाखल केले मात्र वाटेतच आणखी एकाचा मृत्यू झाला. दर्यापूर रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी जखमींची तपासणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ जखमींना अमरावती येथील रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मात्र पुन्हा वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित सात जणांवर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


दरम्यान अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यात 214 अपघात झाले असून या अपघात तबल 117 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 120 दिवसांत झालेल्या अपघातात 177 जण जखमी झाले आहे. अतिवेग, बेदरकारपणा अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे तर सर्वाधिक अपघात अचलपुर उपविभागात झाल्याची माहिती आहे.