अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मागील काही आठवड्यापासून शुक्रवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत अमरावती जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. असं असलं तरी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धा नदीवर असलेल्या "बगाजी सागर" हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने शुक्रवारी या धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी जनता कर्फ्यू ला पायदळी तुडवले, आणि या धरणावर एकच गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा नदी ओसंडुन वाहत असताना सुद्धा अति उत्साही पर्यटकांनी या धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उड्या टाकल्या. धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होणार हे निश्चित असून सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलीही उपाय योजना करन्यात आली नव्हती. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आले.यातून ६०२ क्युमेंक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 


विशेष म्हणजे या धरणावरून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी डेपोला पाणीपुरवठा करण्यात येतो. शुक्रवारला दरवाजे उघडण्यात आले होते. तर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता. दरम्यान आज  शनिवारला ला वरुड बगाजी येथे हजारो नागरिकांनी धरणातील पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी गर्दी केली होती तर काहींना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. 


कोरोना विषाणूचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होत असताना व जनता कर्फ्यू असतानासुद्धा नागरिकांनी जनता कर्फ्यू चा तमाशा बनवला. प्रशासनातर्फे याठिकाणी कोणतीही व्यवस्था न करण्यात आल्यामुळे प्रकार असला प्रकार घडला आहे.