निलेश खरमरे, पुणे - भोरमधील भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार आढळुन आले आहेत. या प्राचीन खेळाचे अवशेष सापडल्याने पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्राचीन खेळांच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वशास्त्र विभागाची टीम भोरला आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त अश्या प्रकारचे खेळ आढळत असल्यानं, शासनाने यात लक्ष घालून खेळांचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आधी पुणे जिल्ह्यात अश्याच प्रकारचे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले होते. नाशिकचे अभ्यासक सोज्वळ साळी यांना हे खडकांवरील पटखेळ आढळून आले आहेत. प्राचीन काळात खडकांवर मनोरंजनासाठी पटखेळ कोरले जायचे. आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत. त्यानंतर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर 41 पटखेळ आढळून आले. त्यानंतर कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर मंकला या खेळाचे 35 पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे आढळून आले आहे.


मंकला खेळाचा उपप्रकार 
मंकला हा मुख्य खेळाचे उपप्रकार असल्याचे दिसून आले. अळीगुळीमाने नावाने मंकला हा खेळ आजही भारतातील कन्नड भागात खेळला जातो. खडकांवर खड्डे असलेल्या मंकला या खेळाचे विविध प्रकार जगभरातील विविध देशांमध्ये खेळले जात असल्याचे पुरावे मिळतात. त्याबाबत आतापर्यंत संशोधनेही झाली आहेत. 


भोर येथे सापडलेल्या पटखेळांविषयी अभ्यासक साळी म्हणाले, की प्राचीन पटखेळ संवर्धन मोहीम अंतर्गत पुण्यातील भोर तालुक्यात भोरदरा येथील परिसरात राजेश महांगरे यांना मिळालेल्या खेळांची दस्तऐवजीकरण आणि नोंदणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कापूरहोळ येथे सापडलेल्या सर्व खेळांचेसुद्धा दस्तावेजीकरण करण्यात आलयं.  भोरचे इतिहास अभ्यासक राजेंद्र महांगरे आणि संकेत मोरे यांनी हे खेळाचे अवशेष या भागात असल्याचे समोर आणले आहे. त्यानंतर पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक सोज्वळ साळी, विवेक दाणी,महेश शिरसाठ या अभ्यासकांनी भोर येथे येऊन या खेळांवर अभ्यासाला सुरुवात केली आहे.