ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर आता आणखी 2 महत्वाचे निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत. 


आनंद आरोग्य केंद्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एसटीच्या 343 बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.  एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय जाहीर केलाय. याअंतर्गत अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तेथे संबंधित संस्था आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देऊ शकते.


प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गट स्टॉल 


प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा देण्यात येणार आहे. या ठिकाणी परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करता येतील. यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारले जाणार आहे. तसेच या स्टॉलसाठी 10 बाय 10 आकाराची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


मूल आणि धारणी येथे नवे आगार 


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. 


नवीन 2500 साध्या बसेस खरेदी


नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली 304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.