गजानन देशमुख, झी मीडिया परभणी :  तलावाचा गाळ काढताना सापडले प्राचीन शिल्प, शिलालेख आणि बुद्ध मूर्ती सापडल्याचा दावा केला जात आहे. परभणीत हे इतिहासाचे साक्षीदार ठरणारे प्राचीन अवशेष सापडले आहेत. या प्राचीन वस्तुंचे संशोधन करुन याचे जतन केले जावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथे वन विभागाच्या वतीने पुरातन पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी पाझर तलावातील गाळ काढताना पुरातन मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत.  यात काही मूर्ती, शिल्प आणि शिलालेख ही आढळली आहेत. यातील एक बुद्ध मूर्ती असावी असा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 


मूर्ती आणि अवशेष हे कोणत्या शतकातील आहेत याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. त्याचबरोबर वेगवेगळे शिलालेख ही आढळून आले आहेत. पुरातत्त्व विभागाने या मूर्तीची पाहणी केल्यानंतरच ही मूर्ती कुणाची आहे,याची माहिती मिळणार आहे. याबाबत संशोधन झाल्यानंतर इतिहासातील आणखी पान उघड होणार आहे. 


पंढरपूरमध्ये जपलाय साडेसातशे वर्षापूर्वी झालेल्या एका यज्ञाची माहिती देणारा प्राचीन शिलालेख 


पंढरपूरमध्ये साडेसातशे वर्षापूर्वी झालेल्या एका यज्ञाची माहिती देणारा प्राचीन शिलालेख आजही जपला गेला आहे. विठ्ठल मंदिर हे त्या काळात यादव साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. तत्कालीन यादव सम्राट राजा महादेव यांचा केशव पुत्र भानूने याठिकाणी यज्ञ केल्याचा ऐतिहासिक पुरावा आजही टिकून आहे. 


अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना इथं प्राचीन मूर्ती सापडली. जैन समाजाचे नेमिनाथ महाराज यांची पाषाणाचीही मूर्ती असल्याचं बोललं जातं आहेय. या मूर्ती विषयी माहिती पुरातन विभागाला देण्यात आली. 


नागपूरच्या कोहळा गावाजवळ महापाषाण संस्कृतीचे पुरातन अवशेष सापडले


नागपूरच्या कोहळा गावाजवळ महापाषाण संस्कृतीचे पुरातन अवशेष सापडले होते. पिपरडोल टेकड्यांच्या परिसरात शिलावर्तुळ आणि प्राचीन वसाहत स्थळ आढळून आले. लोहयुगातील हे पुरातत्व अवशेष तब्बल अडीच ते पावणे तीन हजार वर्षापूर्वीचे आहे. पुरातत्व संशोधक डॉक्टर मनोहर नरांजे यांनी याचा शोध लावला.