त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन
आधार कार्ड बँकेशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनाही त्यांचं प्रलंबित वेतन रोखीनं मिळणार आहे.
मुंबई : आधार कार्ड बँकेशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनाही त्यांचं प्रलंबित वेतन रोखीनं मिळणार आहे. अंगणवाडी कर्मचा-यांना त्यांचं मानधन वेळेत मिळावे यासाठी सध्या ते पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतं. पण बँक खाती आधार कार्डशी संलग्न केली नसल्यामुळे काही अंगणवाडी कर्मचा-यांचं मानधन जून २०१७ पासून रखडलं आहे.
हे थकीत वेतन सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मोहीम राबवून डिसेंबर २०१७ पर्यंत उर्वरीत अंगणवाडी कर्मचा-यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०१८ पासून त्यांचं मानधन थेट बँक खात्यातच जमा केलं जावं, असे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे सुमारे २२ हजार अंगणवाडी कर्मचा-यांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही.