सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची झळ आता सांगलीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चाप बसायला सुरूवात झालीय. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना नोटीस बजावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामात कुचराई केल्याचा ठपका या दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. रजेवरील अधिकाऱ्यांच्या जागी सक्षम पोलीस अधिकारी न नेमल्यामुळे नोटीस देण्यात आलीये. पोलीस महानिरीक्षकविश्वास नांगरे-पाटील यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवसापासून होत आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. अनिकेत हत्याप्रकरणाचा प्रमुख आरोपी युवराज कामटेला पाठिशी घालणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करत काल सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. 


आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार याप्रकरणी काही राजकीय नेते आणि वरिष्ठ अडचणीत येण्याची शक्यता आहे. य़ाप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. तर राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज असल्यानं गृहमंत्रिपदाचा कार्यभार दुस-य़ाकडे सोपवण्याची मागणी मनसेनं केलीय.