प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरातून (Kolhapur) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  कोल्हापुरातील पंचगंगा नदीतील (panchganga river) प्रदूषणामुळे नदीतील जलचर आधीच संकटात आलेत. त्यातच आता मासेमारी करण्यासाठी चक्क ब्लिचिंग पावडरचा (bleeching powder) वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारची मासेमारी जलचरांना त्याचबरोबर मानवी आरोग्यास देखील अधिक धोकादायक ठरू शकते अशी भीती पर्यावरण अभ्यासक आणि डॉक्टरानी व्यक्त केली आहे


कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा नदी ओळखली जाते. पण गेल्या काही वर्षापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाल्याने जलचर संकटात आले आहेत. त्याचबरोबर नदीतील पाणी पिणाऱ्या ग्रामस्थांचं आरोग्य देखील धोक्यात आल आहे.  असं असूनही पंचगंगा नदीत आजही मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडलं जात आहे.


लाल फितीचा कारभार आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे नदीतील जलचर मोठ्या संकटात आहेत. भरीत भर म्हणून आता मासेमारी करणारे अनेक जण मासेमारी सोपी व्हावी यासाठी चक्क ब्लिचिंग पावडरचा वापर करत आहेत. अशा प्रकारची मासेमारी नदीतील जलचरांना आणि मानवी आरोग्यास देखील घातक ठरू शकतात



हौसेसाठी मासेमारी करणाऱ्या व्यक्ती ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्याचं पारंपारिक मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचं म्हणणं आहे. ब्लिचिंग पावडरचा वापर करून मासेमारी करणाऱ्या व्यक्ती पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकतात. त्यानंतर गळ किंवा जाळी टाकून मासे अलगद पकडतात.


पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्याने पाण्यातील ऑक्सिजन कमी होतं.  त्यामुळे मासे तडफडत अलगत मासेमारीच्या जाळ्यात येतात.


पण यामुळे नदीतील माशांबरोबर इतर जलचर देखील नष्ट होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त करत आहेत.