मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कट्टर विरोधक अर्जुन खोतकर शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रावसाहेब दानवे जालना मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आता शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे दानवे यांनाच पुन्हा जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये दानवे यांनी शिवसेनेविरोधात उघडलेल्या मोहीमेमुळे येथील शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढल्यास अर्जून खोतकर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होते. मात्र, युतीच्या निर्णयामुळे हा पर्याय बंद झाल्याने खोतकर यांची कोंडी झाली होती. त्यामुळे खोतकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. 


युती झाली तरी जालना येथील शिवसैनिकांनी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करायला स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर अर्जुन खोतकर यांना दानवे यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर खोतकर लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील व्यापक समीकरणे पाहता उद्धव यांच्याकडून दानवे यांच्या उमेदवारीला विरोध केला जाण्याची शक्यता कमीच आहे. तर दुसरीकडे दानवे यांच्याविरोधात कायम दंड थोपटून उभे राहणारे खोतकरही माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे खोतकरांची समजूत काढण्यात उद्धव यांना कितपत यश येईल, याबाबत साशंकताच आहे. परिणामी खोतकर जालना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर दानवे यांच्याविरोधात उभे ठाकणार आहेत. मात्र, दुसरीकडे जालना मतदारसंघाची जागा धोक्यात असल्याने भाजप स्वत:हूनच ती शिवसेनेला देणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी अर्जून खोतकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.