Chief Minister Eknath Shinde Post: वरळीमध्ये रविवारी पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचे पडसाद राज्यातील राजकारणामध्येही उमटत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने दिलेल्या कारच्या धडकेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला 24 वर्षीय मिहिर शहा फरार आहे. या प्रकरणामध्ये कोर्टाने राजेश शहा यांना जामीन मंजूर केला असला तरी दोन दिवसांनंतरही मिहिर फरार आहे. असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक संदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.


न्यायाचा असा गर्भपात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. हे सारं असह्य करणारं आहे की शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्थेत फेरफार करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गर्भपात सहन केला जाणार नाही," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


पोलिसांना निर्देश


"सर्वसामान्य नागरिकांचे प्राण आमच्यासाठी अनमोल आहेत. ही प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि न्याय मिळावा याची खात्री करावी असे निर्देश मी राज्य पोलीस विभागाला दिले आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत," असा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आहे. 


"मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की..."


"मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग ती व्यक्ती श्रीमंत असो, प्रभावशाली असो किंवा नोकरशहा असो अथवा मंत्र्यांची संतती असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला कोणतंही संरक्षण  मिळणार नाही. अन्यायाबद्दल माझे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे. "मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझे प्रशासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं मुख्यमंत्र्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 



परदेशात पळून जाण्याची शक्यता


दरम्यान, वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात मरण पावलेल्या कावेरी नाखवा यांच्यामृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या मिहिर परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 'लुक आऊट सर्क्युलर' जारी केलं आहे. मिहिर परदेशात पळून जाऊ शकतो म्हणूनच देशातील सर्व विमानतळे आणि बंदरांवर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे कोर्टाने राकेश शहा यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना सोमवारी जामीन मंजूर केला आहे.