अनिरुद्ध दवाळे, अमरावती : कृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन (Farmer's protest) सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू हे आज दिल्लीसाठी रवाना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि हजारो कार्यकर्ते यांच्यासह गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचे चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सहा हा अर्ध्या तासापासून ठप्प झाला आहे. हजारो शेतकरी हे दुचाकी चार चाकी वाहनाने जाऊन दिल्लीत धडक देणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन तारखेपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तोडगा निघाला नाही तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतूल मार्ग दिल्लीला जाऊन मी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा देणार आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. परंतु तीन तारीख उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर आज बच्चू कडू यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.



राज्यमंत्री बच्चू कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी वरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे आणि आता त्यांचा पहिला मुक्काम हा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होणार आहे. उद्या राज्यमंत्री बच्चू कडू मध्यप्रदेशची सीमा ओलांडणार आहे. सीमा ओलांडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या घराला घेराव घालणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे मध्य प्रदेशात येऊ देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की कुठल्याही सरकारच्या दबावाला बळी न पडता शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा करून थेट दिल्ली गाठणार असल्याच बच्चू कडू यांनी स्पष्ट केल आहे.