चंद्रशेखर भुयार झी मीडिया, आसनगाव : मुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.


स्टेशनचं सुशोभीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसनगाव रेल्वे स्थानक सध्या एलईडी दिव्यांनी उजळून निघालंय. मुंबई कसारा मार्गावरील हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. या स्थानकावर दोन सौर पॅनलचा आणि एक विंड एनर्जी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दिवसाला १५ किलोवॅट ऊर्जेची निर्मिती होत असून स्थाकावरील एलईडी दिवे, ऊर्जा बचत करणारे सिलिंग फॅन आणि तिकीट खिडक्यांवरील संगणक प्रणालीही या नैसर्गिक विद्युत व्यवस्थेवरून सुरु आहे. या प्रणालीमुळे या स्थाकावर ७५ टक्के ऊर्जेची बचत होणार आहे.


प्रशासनाकडून दखल


या स्थानकात सौर ऊर्जेतून विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार सहा किलोवॅट निर्मितीक्षमता असलेले सौर ऊर्जेचे युनिट या भागामध्ये बसवण्यात आले होते. अखेर या स्थानकाचे रुपांतर ग्रीन स्थानकात करण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पासाठी आणखी दोन सौरऊर्जा युनिट दाखल करण्यात आली. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण-कसारा दरम्यान असलेले आसनगाव स्थानक हे उपनगरीय रेल्वेसाठीचे टर्मिनल स्टेशन असले तरी या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांसाठी पुरेशा सेवा अद्याप उपलब्ध झालेल्या नव्हत्या. मात्र, आता हे रेल्वे स्थानक ग्रीन स्थानक बनल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर आपल्या स्थानकाची दखल घेतल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.


पर्यटन स्थळांचाही होणार विकास?


आसनगाव परिसरात माहुली किल्ला आणि मानसमंदिर यांसारखे पर्यटन स्थळ आहेत, याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. दिवसाला सुमारे ७५ हजारांहून अधिक प्रवासी या भागांतून रेल्वने प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकाकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघाने समाधान व्यक्त केले आहे.


कायम दुर्लक्षित असलेल्या या रेल्वे स्थानकांचे रुपडे आज पालटून गेले आहे. या रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली असून स्थानकावरील भिंतीवर विविध चित्र रेखाटून संपूर्ण रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात बगीचाही फुलवण्यात आला असून आता ४ तारखेला या स्थानकाची ग्रीन स्थानक म्हणून  औपचारिक घोषणा होणार आहे.