Ashadhi Ekadashi 2024 : जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि...  या ओळींमध्ये किती गोडवा आणि खरेपणा आहे ना. प्रत्येक वारकऱ्याच्या मनात वारीच्या वाटेवर असताना ही एकच ओढ असते असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रपंच सांभाळून, शेतशिवाराची कामं करून आणि हाताशी असणारी शिदोरी घेऊन वारकरी संप्रदायातील कैक मंडळी दरवर्षी न चुकता वारी करतात. पंढरीच्या दिशेनं पायी प्रवास करणाऱ्या या वारकऱ्यांना आस असते ती म्हणजे विठ्ठल भेटीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मैलांना प्रवास करून वारीच्या वाटेवर निघणारे हे वारकरी अनेकदा आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात न जाता कळसाचं दर्शन घेऊन परततात. जणू त्यांना त्या कळसावरच साक्षात विठुराया विराजमान दिसतो. अशाच वारकऱ्यांच्या आणि भक्तिच्या महासागरातून काही वारकरी दर्शनरांगेत उभे राहून (Pandharpur Vitthal Mandir) विठ्ठलाच्या पायी डोकं ठेवून कृतज्ञता व्यक्त करतात. यंदाच्या वर्षी याच लाखो वारकऱ्यांपैकी एका दाम्पत्याला प्रत्यक्ष विठ्ठलाची भेट घडली आणि निमित्त होतं ते म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात केल्या जाणाऱ्या महापुजेचं. (Ashadhi Ekadashi)


दरवर्षीप्रमाणं यंदाही आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरातील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित होत्या. या शासकीय महापूजेच्या वेळी सर्वांच्या नजरा खिळल्या त्या म्हणजे एका शेतकरी जोडप्यावर. कारण, हे जोडपंच होतं यंदाचे मानाचे वारकरी. 


हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न


 


यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. अहिरे दाम्पत्य मागील 16 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहे. यावेळी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळणं म्हणजे जीवनच सार्थकच होणं, अशी भावना यावेळी अहिरे दाम्पत्यानं व्यक्त केली. मानाचे वारकरी म्हणून निवड झाली तेव्हा जीव घाबरा झाला... काही क्षणांसाठी नेमकं काय घडतंय हेच त्यांना कळेना इतका आनंद या दाम्पत्याला झाला होता. विठ्ठलाकडे आपण सर्वांसाठी सुख, शेतशिवारासाठी पाऊस आणि समृद्धी मागितल्याचं म्हणत अतिशय भाबडेपणानं त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.  



कसे निवडतात मानाचे वारकरी? 


प्रतिवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरीसुद्धा असतात. त्यांनाही या शासकीय महापूजेचा मान मिळतो. यासाठी एक निवड प्रक्रिया असते. आषाढीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता दर्शन रांग थांबवली जाते. ही दर्शन रांग जिथे थांबवली जाते तिथे असणाऱ्या पती-पत्नी अर्थात रांगेत पहिल्या जोडप्याचा शोध घेतला जातो. पहिलं दाम्पत्य मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का याची विचारणा केली जाते. त्या वारकरी दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यास या दाम्पत्याची मानाचं वारकरी दाम्पत्य म्हणून निवड केली जाते.


मानाच्या वारकऱ्यांना मिळतात 'या' सुविधा 


मानाच्या वारकऱ्याची निवड होताच या वारकरी जोडप्याला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळतो. या शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार होतो. या मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाच्या मोफत एसटी प्रवासाचा पासही दिला जातो.