पुणे : Ashadi Wari: तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा. दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर विठूराया आणि वारकऱ्यांची भेट होणार आहे. नुकतीच तुकोबारायांच्या पायी पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 20 जून रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या देहू नगरीत दाखल होतात आणि लाखो वाकऱ्यांचा समूदाय पंढरीची वाट चालू लागतो.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग दोन वर्ष कोरोनामुळे पायी पालखी सोहळा झाला नव्हता. याच काळात संतांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान झालं; मात्र ते निर्बंधासह. मात्र यंदा पायी पालखी सोहळा होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाचं संकट कमी झालं आहे. त्यामुळे सध्या देहू नगरीत पालखी सोहळ्याची तयारी सुरु आहे.


संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो. आषाढी एकादशीला म्हणजे 10 जुलै रोजी पालखीची पंढरपुरात नगरप्रदक्षिणा होते. दरवर्षीपेक्षा यंदा वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.