चंद्रपूर : सर्वत्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. चंद्रपुरात काँग्रेसचे उमेदवार विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विनायक बांगडे यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांना दूरध्वनी करून याबाबत नाराजी व्यक्त केली. दूरध्वनी केल्यानंतर या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपुरात विनायक बांगडे यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याची बाब उघड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना चंद्रपूरमधील एका कार्यकर्त्यांने दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षात मुकुल वासनिक यांची चलती असल्याची बाब चव्हाणांनी स्पष्ट केली. बंडखोर शिवसेना आमदार धानोरकर यांना तिकीट देण्यासाठी आपण अनुकूल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपण स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचेही या क्लिपमधून स्पष्ट केले आहे. आपलं पक्षात कोणीही ऐकत नसल्याची खंत अशोक चव्हाणांनी व्यक्त केली आहे. 


चंद्रपूरातील राजकारण चांगलच तापले आहे. विनायक बागडेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस कार्यकर्ते, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट वाटप प्रक्रियेत अशोक चव्हाण हताश झाले असून या क्लिपबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याप्रकरणात आता काँग्रेसमधील नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.