दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश करू इच्छाणाऱ्या काही आमदारांच्या प्रवेशाबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता असून हे प्रवेश लटकण्याचीही शक्यता आहे. जे मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे होते अशा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांना आपल्या पक्षात कसा प्रवेश द्यायचा ? हा प्रश्न भाजपासमोर आहे. २००९ साली शिवसेना-भाजपाने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र २०१४ ची निवडणूक स्वतंत्र लढवली आहे. त्यामुळे २००९ साली युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्यांसाठी शिवसेना सोडणार का ? हा खरा प्रश्न आहे. या मुद्यावरूनही युतीच्या जागावाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या काँग्रेसमधून भाजपात येणाच्या तयारीत असलेले कालिदास कोळंबकर यांचा नायगाव, जयकुमार गोरे यांचा माण, भारत भालके यांचा पंढरपूर, तर गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया हे मतदारसंघ युतीच्या मागील जागावाटपात शिवसेनेकडे होते. हे मतदारसंघ शिवसेनेने सोडले नाहीत, तर या आमदारांची आणि भाजपाचीही अडचण होऊ शकते. मी भाजपात जातोय हे जगजाहीर आहे. अधिवेशनानंतर हा निर्णय होईल असं वाटतंय. पण भाजपा प्रवेशासाठी उशीर होतोय असं वाटत नाही असे कालिदास कोळंबकर यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले. मतदारसंघ भाजपाकडे घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. गिरणी कामगारांचे प्रश्न, बीडीडी चाळ, पोलीसांची घरे हे माझे प्रश्न सोडवा मी त्या पक्षाला ताकदीने पाठिंबा देईन अशी पुनरोक्तीही कोळंबकर यांनी केली. 



मी योग्य वेळी आमदारकीचा राजीनाम्याचा निर्णय घेणार असून राजीनामा देऊन मला तीन-चार महिन्यांसाठी मंत्रीपद नको आहे. ज्यांना मंत्री व्हायचंय ते राजीनामा देतील. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कामाचा स्पीड कमी होईल आणि मला तो स्पीड कमी करयाचा नाही असे कोळंबकर यांनी म्हटले आहे.