दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेत पोलीसांचे पगार काढण्यासाठी निर्णय घेतला आणि पदाचा दुरुपयोग केला हा आरोप खोटा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. पोलिस पगारांबाबतचा जीआर 2005 साली काढला असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. फडणवीस यांच्याएवढा खोटा मुख्यमंत्री राज्याने पाहिला नव्हता असा हल्लाबोल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2005 साली 15 बँकांचा जीआर काढला होता मात्र 2017 साली पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आलं आणि पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. विलासराव देशमुखांनी 2005 साली 15 बँकांचे परिपत्रक काढले त्यांच्या पत्नी कुठल्या बँकेत नव्हत्या. हे परिपत्रक काढलं तेव्हा अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत होत्या असेही पटोले म्हणाले. 


पाच वर्षात अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती कशी झाली ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असेही पटोले यांनी म्हटले आहे. 



यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला यात गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी ही जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतल्याचेही त्यांनी म्हटले.  उच्च न्यायालय हे स्वत: करते म्हणजे यात गडबड झाली आहे असेही ते म्हणाले. 


पोलखोल यात्रेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पोलखोल यात्रा बंद कुठे झाली ? ती सुरूच आहे असे पटोले यांनी म्हटले. काँग्रेसमध्ये गडबड नाही, भाजपा, शिवसेनेमध्ये गडबड आहे. उमेदवार जाहीर होऊ द्या मग काय होते ते पहा असे आव्हानही पटोले यांनी केले आहे.