पुणे : राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक इच्छुकांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरांची संख्या वाढली. राज्यभरात शिवसेना-भाजपाला या बंडखोरीचा मोठा फटका बसला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांना शांत करण्यास आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्याप्रमाणे युतीचे नेते कामाला लागले. त्यांना काही अंशी यश मिळाल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्येही काही बंडखोरींनी आपले बंड मागे घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना बंडखोर गंगाधर बधे यांनी हडपसर मधून अर्ज दाखल करत बंडखोरीचे निशाण फडकवले होते. हडपसरमध्ये योगेश टिळेकर भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात गंगाधर बधे यांचे प्रमुख आव्हान होते. पण त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून चेतन तुपे मैदानात आहेत. त्यामुळे हडपसरमध्ये दुरंगी लढत होणार आहे. 


काँग्रेसचे बंडखोर आबा बागूल यांनी देखील माघार घेतली आहे. त्यांनी पर्वती मधून दाखल उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पर्वतीमध्ये अश्विनी कदम या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. तर भाजपाकडून माधुरी मिसाळ रिंगणात आहेत. पर्वतीत या दोघींमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. 



शिवसेनेचे बंडखोर संजय भोसले यांनी वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांनी आज माघार घेतली आहे. वडगाव शेरीमध्ये जगदीश मुळीक हे भाजपचे उमेदवार आहेत. मुळीक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे रिंगणात आहेत. 


भाजपाचे बंडखोर भरत वैरागे यांनी देखील माघार घेतली आहे. कॅन्टोन्मेंट मतदार संघातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून रमेश बागवे रिंगणात आहेत. तर शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांनीही माघार घेतली आहे. 


शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश कोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  खडकवासला मतदार संघातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. 
खडकवासल्यात भीमराव तापकीर हे भाजपचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून सचिन दोडके मैदानात आहेत. त्यामुळे खडकवासलात दुरंगी सामना पाहायला मिळणार आहे.