मुस्तान मिर्झा, झी २४ तास, उस्मानाबाद : निवडणुकीच्या वादातून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बुधवारी चाकूनं हल्ला करण्यात आला. उस्मानाबाद कळंबमधील नायगाव पाडोळी गावात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी अजिंक्य टेकाळे नावाच्या तरुणानं त्यांच्यावर धारदार चाकूनं प्राणघातक हल्ला केला. ओमराजेंच्या पोटावर, हातावर आणि मनगटावर त्यानं वार केले. परंतु, या हल्ल्यात निंबाळकर किरकोळ जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल केल्याची माहिती उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी दिलीय. दरम्यान, अजिंक्य टेकाळे याचा आणि पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भाजपाकडून करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याची बाब म्हणजे, शिवसेना खासदारावर चाकू हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण भाजपा पदाधिकारी असल्याचं म्हटलं होतं. याबद्दलच भाजपानं खुलासा केलाय. 


भाजपाचं स्पष्टीकरण


परंतु, अजिंक्य टेकाळे कळंब भाजपा आयटीसेलचा तालुका अध्यक्ष असल्याचा दावा भाजपानं मात्र फेटाळून लावलाय. अजिंक्य टेकाळे हा भाजपाचा पदाधिकारीच काय पण कार्यकर्ता किंवा प्राथमिक सदस्यही नाही... तर टेकाळे ही व्यक्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील 'शंभो प्रतिष्ठान' या संस्थेचा पदाधिकारी असल्याचं, स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलंय.