व्हिडिओ : `कूल` मुख्यमंत्री जेव्हा माईकवाल्यांची फिरकी घेतात...
भाषण देण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिल्यावर माईकची उंची कमी असल्याचं लक्षात आलं...
नेर, धुळे : विधानसभा निवडणूक २०१९ च्या तापलेल्या वातावरणातही मुख्यमंत्री फडणवीस मात्र 'कूल' दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी फिरकी घेतली तेव्हा काय होतं? याचा प्रत्यय धुळे जिल्ह्यातल्या नेर इथं आला. धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेर इथं आले होते. भाषण देण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिल्यावर माईकची उंची कमी असल्याचं लक्षात आलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संधी साधत साऊंड सिस्टमवाल्याची फिरकी घेतली.
'लोकांनी माझी उंची वाढवलीय... पण माईक खाली आहे... जरा वाढवा उंची' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर भर सभेत एकच हशा पिकला. तत्काळ माईक सिस्टम टीमनं स्टेजवर दाखल होत मुख्यमंत्र्यांना हवी तेवढी माईकची उंची वाढवून दिली... आणि मग मुख्यमंत्र्यांनी आपलं पुढचं भाषण सुरू केलं.
दरम्यान, आजही भाजपाच्या स्टार आणि दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेताना दिसणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरात सहा प्रचारसभा होणार आहेत. यात सोलापुरात दोन, साताऱ्यात दोन, भोसरीत आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक-एक सभा होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. परभणीतील सेलू, जळगावमधल्या रावेरमध्ये सभा होईल. तसंच मुंबईत काळबादेवी आणि कांदिवलीत सभा होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, उस्मानाबादमधील तुळजापूर आणि लातूरमधील औसा या ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.