काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस अथवा राष्ट्रवादीमध्ये राहिलो तर आपलं राजकीय भवितव्य अडचणीत येईल, अशा विचारात असलेले दोन्ही पक्षातील आमदार लवकरच पक्षांतर करू शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असून यामुळे नजिकच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठी खिडार पडण्याची शक्यता आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी शिवसेना-भाजपाची वाट धरली होती. त्याची पुनरावृत्ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सुरू झाली आहे. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर तर काठावर असलेले विरोधी पक्षातील आमदारही शिवसेना किंवा भाजपात जाण्याच्या निर्णयाप्रत पोहचू शकतील अशी शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये माढाचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, नगरचे आमदार संग्राम जगताप, अकोलेचे आमदार वैभव पिचड हे भाजपाच्या संपर्कात आहेत. तर श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे, वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,
उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांच्याशिवाय गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप नाईक भाजपाच्या संपर्कात असून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघही पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसही मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपाच्या प्रवेश केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचेही आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सिद्धाराम म्हेत्रे-अक्कलकोट, भारत भालके-पंढरपूर, बबनदादा शिंदे- माढा, अब्दुल सत्तार(सिल्लोड)-औरंगाबाद, जयकुमार गोरे(माण) -सातारा, गोपालदास अग्रवाल-गोंदिया, सुनील केंदार (सावनेर)- नागपूर ही नावे भाजपा संपर्कात असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या विरोधी पक्षातील आमदार आपल्या राजकीय भवितव्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरत आहेत. विरोधी पक्षात राहिलो तर आपण निवडून येणार नाही याची भीती काही आमदारांना वाटतेय. तर काही आमदारांच्या संस्था अडचणीत असल्याने ते सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जात आहेत. आधीच लोकसभा निवडणुकीतील पराभवानं खचलेल्या दोन्ही काँग्रेस पक्षासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणारा हा मोठा फटका असेल.