`सरकारला स्वस्थ बसू देणार नाही`; खडसेंचा पुन्हा भाजपला घरचा आहेर
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळालेलनं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळालेलनं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. नाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ गप्प बसणार आहे का? विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं आहे. एकनाथ खडसे हे बुलढाण्यातल्या मलकापूरमधले युतीचे उमेदवार चैनसुख सांचेती यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला पक्षात बोलावलं होतं, तसंच विरोधी पक्षनेतेपदाची ऑफरही दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला होता. मला उमेदवारी मिळणार नाही, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि माझ्यात चर्चा झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का?, असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता.
एकनाथ खडसेंचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित केला होता. त्यामुळे खडसेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यानंतर खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. यानंतर अखेर भाजपने एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसेंना विधानसभेची उमेदवारी दिली.