योगेश खरे, झी २४ तास, जळगाव : उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीमधला बेबनाव वाढत चाललाय. आधीच महायुतीला बंडखोरीचा फटका बसलाय. त्यात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमंत्रण नसताना थेट पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसखोरी केली. 'मला बी व्यासपीठावर येऊ द्या की रं... मला बी भाषण करू द्या की रं...' म्हणत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सभेत एकच गोंधळ घातला. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार... पण त्यांच्या मतदारसंघात भाजप बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांनी त्यांना आव्हान दिलंय. भाजपकडून बंडखोरीला बळ दिलं जात असल्यानं आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ते थेट पंतप्रधान मोदींच्या सभेला पोहोचले... त्यामुळं एकच गोंधळ उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना बोलवून घेतलं. त्यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत जागा दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना भाषण करण्याची परवानगी देखील देण्यात आली. मात्र तोवर पंतप्रधान सभास्थानी आल्यानं पाटलांची संधी हुकली.


केवळ गुलाबराव पाटीलच नव्हे, तर अनेकठिकाणी भाजपच्या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसतोय. पाचोरा मतदारसंघात भाजप पदाधिकारी अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांना आव्हान दिलंय. चोपडा मतदारसंघात बंडखोर प्रभाकर सोनवणे यांनी शिवसेना उमेदवार लता सोनवणे यांना आव्हान दिलंय.


धुळे शहरातही शिवसेना उमेदवार हिलाल माळी बंडखोरीमुळं बेजार आहेत. दरम्यान, कुणीही बंडखोरांना साथ देऊ नये, महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा द्यावा, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी हा गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला.


पण, या निमित्तानं महायुतीतील धुसफूस उघडपणे पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या पहिल्या सभेत शिवसेनेच्या गोंधळामुळं भाजपला नमतं घ्यावं लागलं. पण त्यामुळं बंडखोरांचा ताप कमी होणार आहे का? हा प्रश्नच आहे.