मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं दंड थोपटलेत. निवडणुकीच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील सामिल होणार आहेत. याकाळात पंतप्रधानांच्या ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या १८ सभा प्राचार आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे १७ ऑक्टोबरला मोदींची सातारा आणि पुणे अशा दोन सभा आयोजीत करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील सभेमधून मोदींच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा १७ ऑक्टोबरला होणार आहे. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तिथे पोटनिवडणूक होत आहे.


या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या प्रचाराला मोदी येणार असल्यामुळे राजे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यातच मोदी राजेंचा प्रचार करणार असल्यानं राजेसमर्थक जोमात दिसणार आहेत.


उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला, यानंतर साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणूक आणि साताऱ्याची पोटनिवडणूक या एकाच दिवशी होणार आहेत. २१ ऑक्टोबरला निवडणूक होऊन २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत.