शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार या बातमीनेच राज्यातील वातावरण बदलू लागले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तुम्ही स्वत: येण्याची गरज नाही असा ईमेल ईडीला करावा लागला. शरद पवारांनी खेळलेली ही मोठी राजकीय खेळी होती. या पार्श्वभुमीवर आता शरद पवार यांनी ईडीचा ससेमिरा का थांबला ? यावर भाष्य केले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवरून आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर मोठा खुलासा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे आणि अहमदपूर मतदार संघाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचार सभेसाठी आल्यानंतर अहमदपूर येथे बोलत होते.



दिल्लीच्या तख्तावरून सत्ताधारी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्यावेळी हा शिवरायांचा महाराष्ट्र असून हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्ताला नमणार नाही, असे जेंव्हा आम्ही ठणकावून सांगितलं तेंव्हाच ईडी-बिडी सगळे शांत झाल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. 


दरम्यान ईडी प्रकरणी सत्ताधारी भाजपाने सूडबुद्धीनेच कारवाई केल्याचे शरद पवार हे आपल्या प्रचार सभेतून अधोरेखित करीत असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे पवार यांच्या या दाव्याला सत्ताधारी भाजपा काय प्रतिउत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.