प्रताप नाईक, झी २४ तास, इचलकरंजी : इचलकरंजी हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला... मात्र २००९ पासून भाजपानं या मतदारसंघावर पकड मजबूत केलीय. त्यामुळेच काँग्रेसचे निष्ठावंत असले तरी प्रकाश आवाडेंनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. काय आहेत यामागची गणितं... त्यांना फायदा होईल का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राचं मॅनचेस्टर' अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची लढाई आता चुरशीची बनली आहे. कारण काँग्रेसचे निष्ठावंत माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाला रामराम करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांची पक्षावर नाराजी नाही, तर पक्षाबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी, हे या बंडखोरीचं कारण आहे.


भाजपा विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवाराचं मोठं नुकसान होतं हे प्रकाश आवाडे यांनी ओळखलं. त्यामुळं त्यांनी काँग्रेसलाच रामराम करुन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतलीय. त्यामुळं सुरुवातीच्या टप्यात एकतर्फी आणि अटातटीची न वाटणारी निवडणूक रंगातदार स्थितीत पोहचली आहे. 



भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर आवाडेंनी कडवं आव्हान उभं केलंय. प्रस्थापितविरोधी मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक प्रश्न, पूरस्थितीमध्ये सरकारी मदत न पोचोचणं, वस्त्रोद्योगातल्या अचडणी यांना आवाडेंनी महत्त्व दिलंय. 


दुसरीकडे हाळवणकर मात्र केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय, कामं यावर प्रचार करताना दिसत आहेत. तसंच आवाडेंनी काँग्रेसशी केलेली बंडखोरीही हाळवणकर अधोरेखित करत आहेत. 


हाळवणकरांकडे राष्ट्रीय मुद्द्यांची अस्त्रं आहेत, तर आवाडे स्थानिक मुद्दे घेऊन आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. यामध्ये कोण बाजी मारणार हे निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होईल. शिवाय आवाडेंनी रिंगणात उतरवलेल्या आपल्या सहकाऱ्यांमुळे हातकणंगलेमध्ये काँग्रेस आणि शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फटका बसणार आहे.