निकालाला उरले अवघे काही तास, उमेदवारांचं टेन्शन वाढलं
उमेदवारांची धाकधूक वाढली
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : निवडणुकांचे निकाल लागायला आता अवघी एक रात्र शिल्लक आहे...त्यामुळं उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. काय होणार उद्या या चिंतेनं त्यांची झोप उडाली आहे. निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी कोणाच्या बाजुने कल दिला आहे. हे काही तासातच स्पष्ट होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रात्र वैऱ्याची आहे... प्रचार संपला, भवितव्य का काय ते ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. आता चिंता, काळजी, हुरहूर उद्या काय होणार याची.... प्रत्येकाचा अंदाज अपना अपना असला तरी काय होणार, हे विचारायला सर्वाधिक गर्दी झालीय ती ज्योतिषांच्या दारी... बोल पोपटा बोल, माझं काय होणार, यासाठी उमेदवार गर्दी करत आहेत.
विजयाची खात्री असणारे, बंडखोरी करणारे, जिंकू किंवा हरू असे सगळेच उद्या काय होणार या टेन्शनमध्ये आहेत... कारण मतदारराजानं या सगळ्यांचंच भवितव्य ईव्हीएममध्ये लॉक करुन टाकलं आहे.
नितेश राणे, सतीश सावंत, रोहिणी खडसे, रोहित पवार, राम शिंदे, महाडेश्वर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन या मोठ्या नेत्यांचा निकालाकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या १ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.