सांगली विधानसभा : भाजपा युद्धात जिंकली मात्र तहात हरली
दोन मातब्बर नेत्यांनी भाजप संघटनेचा ताबा घेतला आहे.
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात युतीत भाजपा आणि शिवसेना मध्ये चार-चार जागांची विभागणी झाली असली तरी तुल्यबळ उमेदवारांची वानवा, गटबाजी यामुळे शिवसेना नेतृत्वापुढे 'पेच' निर्माण झाला आहे. आतापर्यंत भाजपात मोठ्या प्रमाणात आलेल्या नेत्यांना आम्ही सर्वांचा सन्मान राखू असे सांगत सत्तेचे 'गाजर' दाखवण्यात आले. त्यातच घराणेशाहीच्या राजकारणाला लोक कंटाळले असताना ही पुन्हा तीच स्थिती बदलत्या राजकारणातही पुढे आलेली आहे. दोन मातब्बर नेत्यांनी भाजप संघटनेचा ताबा घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे.
तासगाव कवठेमहांकाळ मध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई पाटील, पलूस-कडेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील, या भाजपच्या नेते मंडळींनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती.
मात्र हे मतदारसंघ सेने कडे गेले. त्यामुळे आता सेनेलाही उमेदवार शोधावा लागणार असून वाळवा-इस्लामपुरातून जयंत पाटील यांचा सामना करण्यासाठी हुतात्मा समूहाचा युवक नेता आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी हे शिवबंधन बांधून मदानात उतरणार आहेत.
युतीच्या राजकारणात ज्यांना आमदारकीची सत्ता हवी असेल त्यांनी शिवसेनेत आल्यास त्यांचा विचार केला जाईल, अशी भूमिका सेनेने घेतली आहे. पण पक्ष वाढवायचा असेल तर स्वपक्षीय लोकांना ताकद दिली पाहिजे, आजवर हे सेनेकडून झालेले नाही, त्यामुळे सांगली जिल्ह्यात गटबाजी संपवून शिवसेना वाढू शकली नाही. एक आमदार निवडून येतोय तो मात्र स्वतःच्या कार्यशैलीमुळे हे लक्षात घ्यावे लागेल. सेनेचे एक प्रमुख नेते दिवाकर रावते यांनी सांगलीत असलेली गटबाजी अगोदर संपवा, असा सल्ला शिवसेना मेळाव्यात नुकताच दिला. पण ते ऐकणार कोण ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
भाजपतून तिकीट न मिळालेले अनेक नेते त्यासाठी सेनेकडे जाण्याच्या मन:स्थितीत नाहीत. तर संबंधित ठिकाणी सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत, असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या जागा आता पुन्हा भाजपला सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
तर दुसरीकडे भाजपाने आपल्या चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मिरजेतून सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, सांगलीतुन आमदार सुधीर दादा गाडगीळ, शिराळ्या मधून आमदार शिवाजीराव नाईक आणि जत मधून विलासराव जगताप यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. जत आणि शिराळा मध्ये उमेदवारी मिळू न शकलेले अन्य इच्छुक उमेदवार नाराज आहेत.