मुंबई : विधानसभा निवडणुकीकरता होणारे मतदान अगदी 2 दिवसांवर आले आहे. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी महाआघाडी आणि महायुतीने जोरदार प्रचार सभा केल्या. दिवसाला दोन-दोन, तीन-तीन ठिकाणी नेते प्रचार सभा घेऊन मतदार राजाचं मनपरिवर्तन करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचा प्रचार हा मैदानातील सभेसोबतच सोशल मीडियावर देखील चांगलाच रंगला. सोशल मीडियावर नेत्यांची भाषण देखील अधिक पसंतीला पडली. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाषण चांगलीच गाजली. 


शुक्रवारी साताऱ्यामध्ये शरद पवारांनी भर पावसांत केलेलं भाषण हे सगळ्या भाषणांमध्ये अव्वल ठरलं. 79 व्या वर्षी डाव्या पायाला दुखापत झालेली असताना देखील शरद पवारांनी साताऱ्यात केलेलं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. एवढंच नव्हे तर #SharadPawar या हॅशटॅगने शरद पवार सोशल मीडियावर ट्रेंड देखील झाले. 


सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.


अकोला जिल्ह्यात बाळापूरच्या सभेत हार घातला जात असताना एक नेता मध्येच घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कोपरानं ढकलून शरद पवारांनी बाजूला केलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.



12 ऑक्टोबर, शनिवारी बार्शीमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शरद पवारांनी विचित्र हातवारे केले होते. आमच्यासमोर कुस्ती लढायला कोणीच नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केला होता. त्याला उत्तर देताना 'कुस्ती पेहलवानांशी होते, अशांशी (हातवारे करत) नाही' असे म्हणत शरद पवार यांनी आक्षेपार्ह हातवारे केले होते. याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला असे नटरंगसारखे हातवारे करता येत नाहीत, असं म्हटलं होतं.


महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासाचा साधा उल्लेखही नसल्यामुळे आता वेगळ्याच राजकीय चर्चांनी आणि आरोप- प्रत्यारोपाच्या सत्रांनी डोकं वर काढलं आहे. ज्यामध्ये सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. यामध्ये शरद पवारांनीही त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली



येत्या 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दिवाळीच्या अगोदरच पक्षांमध्ये फटाके फुटणार आहेत.