दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याची प्रतीक्षा असून ही प्रतीक्षा गणेशोत्सवानंतर संपण्याची चिन्हे आहेत. मागील म्हणजेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सवानंतर 12 सप्टेंबर रोजी झाली होती. यावेळीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच होण्याची शक्यता आहे. राज्यात 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख 13 सप्टेंबरनंतर लगेचच जाहीर होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती. तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख त्याच्या जवळपासच असण्याची शक्यता आहे.


राज्यात याआधीच सर्व पक्ष कामाला लागले आहे. सर्वच इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. सध्या या दोन्ही पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे.


निवडणुका जाहीर होण्याआधीच वेगवेगळ्या माध्यमातून इच्छूक उमेदवारांचा जनसंपर्क आणि प्रचार देखील सुरु झाला आहे.