किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : आज विधानसभा निवडणूक २०१९ साठी महाराष्ट्रभर मतदान उत्साहात सुरू आहे. पण, नाशिकमध्ये मात्र एका आजींनी मतदानाचा एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय. सखुबाई नामदेव चुभळे असं या ८६ वर्षीय आजींचं नाव आहे. सखुबाई यांनी १९६० ते २०१९ मध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क अगत्यानं बजावलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सखुबाई यांनी १९६० पासून ते आजपर्यंतच्या (२०१९च्या) प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या आजीने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सर्व म्हणजे १४ विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.


सखुबाई नामदेव चुभळे

देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते १४ व्या विधानसभा निवडणुकीत आजींबाईंचा सहभाग राहिलाय. सखुबाई या देवळाली विधानसभा मतदार संघातील गौळाणे गावातील मतदार आहेत. 


मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क या आजीबाईंना बजावला आहे. 


वयोमानानुसार, नीट चालताही येत नसलं तरी १४ व्या विधानसभेसाठी सोमवारी सकाळीच नातू विश्वास चुंभळे यांच्यासोबत सखुबाई मतदानासाठी हजर झाल्या. गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामुळे १९६० ते २०१९ या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान करण्याचा विक्रम या आजीने नोंदवलाय.


मतदानाने लोकशाही बळकट होते. भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. त्यामुळेच झी २४ तासकडूनही सर्व मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात येतंय.