काँग्रेसच्या महापर्दाफाश सभांमध्ये अंतर्गत गटबाजीची पोलखोल
नाना पटोले यांच्याकडे यात्रेचे नेतृत्व असल्याने पक्षात मतभेद उफाळले
श्रीकांत राऊ, झी मीडिया, यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करायला निघाली मात्र काँग्रेस अंतर्गत वादातून ही यात्रा ढेपाळली. नाना पटोले यांच्याकडे यात्रेचे नेतृत्व असल्याने पक्षात मतभेद उफाळले परिणामी केंद्रीय व राज्यातील नेत्यांनी यात्रेकडे पाठ फिरविली आणि अखेरीस काँग्रेसला यात्रा गुंडाळावी लागली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ आणि समारोपासोबतच ठिकठिकाणच्या सभा धडाक्यात झाल्या. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसुराज्य यात्रा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील जनसंवाद यात्रेने देखील राज्यात गर्दी खेचली. मात्र त्यातुलनेत काँग्रेसच्या महापर्दाफ़ाश सभा फारशा चर्चेत आल्या नाहीत. या सभांनंतर काँग्रेस अंतर्गत गटबाजीचीच पोलखोल झाली.
काँग्रेसचे प्रचार समितीप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेता ही यात्रा स्वकेंद्रित ठेऊन आयोजित केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सुरवातीला २० ऑगस्ट त्यानंतर २५ ऑगस्ट अशा दोन तारखा जाहीर केल्यानंतर पटोले यांना दोन्ही यात्रा पुढे ढकलाव्या लागल्या. अखेर २६ ऑगस्टला अमरावती येथून यात्रेचा आयोजित शुभारंभ देखील केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे अपशकुनी ठरला.
शुभारभांच्या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, गुलामनबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आदींनी पाठ फिरविली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत यात्रा सुरु झाली मात्र नंतरच्या सभेत तेही दिसले नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेतर एकाही सभेला उपस्थित राहिले नाही विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघात ब्रम्हपुरी येथील सभा देखील काँग्रेस ला रद्द करावी लागली.
मुख्यमंत्र्यांच्या "महाजनादेश' च्या मागोमागच काँग्रेस 'पोलखोल' करायला निघाल्याने सामना रंगणार अशी अपेक्षा होती, त्यादृष्टीने भाजप सोडून काँग्रेस मध्ये आलेल्या नाना पटोले यांनी नियोजन देखील आखले परंतु मरगळ आलेल्या काँग्रेस च्या नेत्यांनी महापर्दाफाश यात्रनिमित्ताने गटबाजीचे, मतभेदाचेच प्रदर्शन घडविल्याने जिथे जिथे यात्रा आयोजित होती. तिथेही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. नाना पटोले यांना यात्रेतील नेत्यांच्या अनुपस्थिती बाबत सारवासारव करावी लागली आणि अखेरीस महापर्दाफ़ाश यात्रेचा गाशा गुंडाळावा लागला.