अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : बँकांच्या एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी एक टोळी नागपूर आणि विदर्भात सक्रिय झाली असून या टोळीने आजवर किमान ३० एटीएम केंद्रांवर चोरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सुमारे ५० लाखाची चोरी झाली असून चोरीच्या सर्वच घटना ठराविक कंपनीने बनवलेल्या एटीएम मशीनमधूनच होत आहेत. महत्वाचे म्हणजे एटीएम मधून पैसे काढल्यावर याचा कुठलाच पुरावा किंवा नोंद त्या मशीनमध्ये राहत नसल्याने या टोळीला या बाबतीतले तंत्रज्ञान पूर्णपणे माहिती असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे


नागपूरसह वर्धा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांशिवाय या टोळीने उत्तर प्रदेशमधेही अश्या प्रकारे एटीएम केंद्रांवर चोरी केल्याची माहिती आहे. स्टेट बँक, सेंट्रल बँक अश्या अनेक खाजगी आणि शासकीय बँकांच्या एटीएम मधून हे पैसे काढण्यात आले. एनसीआर या कंपनीने तयार केलेल्या एटीएममधूनच चोरी झाल्याचं उघड झालंय. 


या मशीनमधील बारकावे आणि त्रुटी संबंधित टोळीतील सदस्यांना माहिती असतील आणि नेमकं याचाच फायदा घेत चोरी झाल्याचा संशय आहे. एकट्या नागपुरात किमान ३० एटीएम केंद्रांवर अशा प्रकारे चोरी झाली असून सुमारे ५० लोकांची रोख यात चोरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


नागपूर पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या राणाप्रताप नगर, नंदनवनसह आणखी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चौकशी सुरु आहे. असे आणखी प्रकार घडण्याच्या आधी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करावी हीच अपेक्षा खातेधारकांची आहे.