Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!
Attack On nikhil wagle : निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे.
Pune Crime News : पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. मात्र, या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना होत असलेला विरोध पाहता कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ज्याची भीती होती, तेच घडल्याचं पहायला मिळालंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे नेते सुनिल देवधर यांनी फिर्याद दिली होती. वागळेंनी सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातल्याचं पहायला मिळतंय.
निखिल वागळे यांची निर्भय सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. काय वाट्टेल ते झालं तरी सभा होणार. सध्या आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गराड्यात आहोत..पण येणार म्हंजे येणार, असं निखिल वागळे यांनी पोस्ट केलं होतं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना जोरदार विरोध केला.
पालकमंत्री अजित पवार म्हणाले...
अतिशय दुर्देवी घटना घडली. महायुतीचं सरकार अशी घटना खपवून घेणार नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मी सीपींशी बोलतो अन् पुढील सुचना देणार आहे. मी महाराष्ट्राची परंपरा नाही, ही आपली संस्कृती नाही, अशी अजित पवार म्हणाले आहेत.
निखिल वागळे म्हणतात...
आजवर माझ्यावर 7 वेळा हल्ले झाले. मरण माझ्या डोळ्यासमोर होतं. मी सर्व हल्लेखोरांना माफ केलंय. जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार. मी अहिंसावादी माणूस आहे. मला मारलं तरी हजारो वागळे तयार होतील. शरद पवारांवर एवढी टीका होते पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता आजवर पाहिला नाही, असं म्हणत वागळे यांनी भाजपला टोले लगावले आहेत. हल्ले करणारे माफिया लोक आहेत, असं म्हणत त्यांनी टीका देखील केलीये.