मुंबई : कराडचे युवा नेते आणि महाराष्ट्र भाजपचे चिटणीस अतुल भोसले उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातारा लोकसभा निवडणूक २०१८ लढवणार असल्याच्या चर्चाँना उधाण आलं होतं. या चर्चांवर भोसले यांनी एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी आपल्या या पत्रकात लोकसभा निवडणुकीविषयी आत्ताच काहीही भाष्य केलेलं नाही. परंतु, आपल्याविरुद्ध विरोधकांनी हेतूपुरस्सर लोकसभेच्या उमेदवारीविषयी बातम्या दिल्या असून त्यावर कुणी विश्वास ठेवू नये, असं प्रसिद्धीपत्रकच अतुल भोसले यांनी काढलंय. 


आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'कराड दक्षिण' या विधानसभा मतदार संघातच विकासकामांचा धडाका लावल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 


येत्या लोकसभा निडवणुकीत भोसले विरुद्ध भोसले सामना रंगणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर अतुल भोसलेंनी हे स्पष्टीकरण दिलंय.  


अधिक वाचा : उद्यनराजे भोसलेंना टक्कर देण्यासाठी आणखीन एक 'भोसले' सरसावले!


कोण आहेत अतुल भोसले?


कराडचं युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अतुल भोसले हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा भाऊ आणि आमदार दिलीप देशमुख यांचे जावई आहेत. गौरवी देशमुख हिच्याशी अतुल भोसले यांचा विवाह झालाय. लातूरच्या देशमुखांचे जावई असलेल्या भोसले यांच्या कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच दरारा आहे.


पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकेकाळचे मातब्बर नेते यशवंतराव मोहिते यांचे हे नातू... पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते असलेल्या अतुल भोसले यांनी २०१४ साली भाजपच्या तिकीटावर पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध कराड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली होती.