राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती : घरोघरी सध्या सगळी लगबग सुरू आहे ती अर्थातच गौरी गणपतीची... अमरावतीच्या अतुल जिराफे यांनी तयार केलेले गौरींचे मुखवटे प्रचंड लोकप्रिय झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीचे प्रसिद्ध मूर्तीकार अतुल जिराफे यांनी तयार केलेल्या सोज्ज्वळ गौरी... गणपतीबरोबर गौरींचंही आगमन होतं आणि या ज्येष्ठा - कनिष्ठा माहेरवाशिणी त्यांच्या मुलाबाळांसह तीन दिवस मुक्कामाला येतात. त्यासाठी गौरींच्या मुखवट्याच्या कारखान्यात आता लगबग सुरू आहे. जिराफेंनी साकारलेले हे गौरी मुखवटे देशाविदेशातही प्रसिद्ध आहेत. 


अतुल जिराफे यांच्या वडिलांनी एक छंद म्हणून मूर्ती घडवायला सुरुवात केली... मग या आवडीचं रुपांतर व्यवसायात झालं. आता अतुल जिराफेंनीही वडिलांचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवलाय. अतुल जिराफे यांनी फाईन आर्टसचं शिक्षण घेतलंय. मूर्ती घडवण्याच्या कामातल्या बारकाव्यांचा अभ्यास करून, रंग संगतीचा सुंदर वापर करत त्यांनी हे गौरीचे मुखवटे घडवलेत.  


जिराफे यांनी तयार केलेल्या गौरींच्या मुखवट्यांना महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटकातही मागणी आहे. इतकंच नाही, तर जिराफे यांनी घडवलेले है गौरी मुखवटे परदेशातही लोकप्रिय आहेत. गौरींबरोबर त्यांची बाळंही जिराफे यांनी अप्रतिमरित्या साकारलीत. गौरींच्या चेहऱ्यावरचा सोज्वळपणा आणि गौरीच्या मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता शब्दांच्याही पलीकडची आहे.