औरंगाबाद : दंगलीतून सावरलेल्या औरंगाबादेत पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. हर्सुल भागातल्या ७ घरांतून तब्बल  १९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे वाळूज भागातही पोलिसांनी दोन गावठी कट्टे जप्त केले आहेत. नक्की ही शस्त्र औरंगाबादमध्ये येतात कशी आणि कशासाठी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा साठा सापडल्याने औरंगाबादकरांची झोप उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीतून औरंगाबाद सावरत आहे. तोच हा धक्कादायक प्रकार घडलाय. औरंगाबाद पोलिसांनी जहांगीरकॉ़लनीतून तब्बल १९ तलवारी जप्त केल्यायत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत औरंगाबादमधले अनेक लोक रस्त्यावर तलवारी घेऊन उतरले होते. त्यानंतरच शहरात ऑनलाईन पोर्टलवरून पन्नासच्यावर तलवारी विकत घेण्यात आल्याचं उघड झालं होतं. आणि आता पुन्हा औरंगाबादच्या जहांगीर कॉलनीतून १९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. 


एकाच कॉलनीतल्या काही मोजक्याच घरात या तलवारी आल्या कोठून, या सगळ्या तलवारी पुरवणाराही एकच माणूस होता, त्यानं शहरात इतर ठिकाणीही तलवारी पुरवल्याचं पुढे आलेय. तलवारी कोठून आणल्या, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास सुरु आहे. मात्र, अशा पद्धतीनं तीन महिन्यांत दुसऱ्यांदा तलवारींचा साठा सापडणं हे शहराच्या शांततेच्या दृष्टीनं निश्चितच घातक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.