सुसाट बाईकवरच्या चुंबनाची इनसाईड स्टोरी, किसिंग स्टंटची `तडप` भोवली
किसिंग स्टंटची काय आहे इनसाइड स्टोरी पाहा व्हिडीओ
विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : प्रेमात वेडे झालेली लोक कधी कुठे काय करतील याचा काहीवेळा नेमच लावता येत नाही. औरंगाबादमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. भरधाव बाईकवरच्या किसिंग स्टंटचा थरार आणि त्यामागची इनसाईड स्टोरी खूपच रंजक आहे.
31 डिसेंबरला नव्या वर्षाची पार्टी करताना तरुणाच्या मित्रांनी एक चॅलेंज दिलं. दोघं प्रेमवीरांनी चॅलेंज पूर्ण केलंही. पण या लव्हस्टोरीचा द एण्ड पोलीस स्टेशनमध्ये झाला. अखेर पोलिसांनी या दोघांना शोधलं आणि अद्दल घडवली.
औरंगाबादेत सुसाट बाईकवरच्या सैराट किसिंग स्टंटची जोरदार चर्चा आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धावत्या बाईकवर प्रियकराच्या समोर उलटी बसलेली तरुणी आणि त्याचे चाळे व्हारल झाले. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेले होते.
क्रांती चौक ते सेव्हन हिल्स अशी साडेतीन किलोमीटरची ही किसिंग स्टंटबाजी सोशल मीडियावर चांगलीच गाजली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी या प्रेमवीरांचा शोध सुरू केला. अखेर बीड बायपास भागातून पोलिसांनी या बाईक मजनूला ताब्यात घेतलं.
किसिंगची 'तडप' भोवली
हा तरुण मित्रांसोबत 31 डिसेंबरची पार्टी करत होता. पार्टी करताना प्रेयसीचा फोन आला आणि हा भिडू अर्धा तास फोनवरच होता. मग मित्रांनी त्याची यथेच्छ खिल्ली उडवली. तुझं खरं प्रेम असेल तर तडप सिनेमातल्या सीनसारखा बाईक किसिंग सीन करून दाखव, असं चॅलेंज मित्रांनी दिलं.
पण हे तडप चॅलेंज त्याला चांगलंच भोवलं. सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे चाळे केल्याबद्दल कानून के लंबे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेच.... सार्वजनिक ठिकाणी बीभत्स चाळे करणे, वाहतूक नियम मोडणे या गुन्ह्यात अखेर या प्रेमवीराला अटक झाली.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. जमिनीवर उगवूनही आकाशापर्यंत पोहोचलेलं, असं कुसुमाग्रज म्हणाले होते. यानं प्रेम केलं बाईकवर पेटलेलं. त्यामुळे थेट जेलची हवा खाण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेम करा, पण जरा दमानं.... नाही तर लग्नाच्या आधी पोलिसांच्या बेड्या पडतील.