व्हिडीओ जर्नलिस्ट अनिल सौंदाड़े सह दिनेश दुखंडे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमधल्या माळीवाडा गावातल्या रस्त्यावर धावणारी दुचाकी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय...ही नक्की सायकल आहे की बाईक हे सांगणं जरा कठीण आहे, पण ती तयार करणाऱ्या शेख बबलूची ही करामत आहे.


भुंगा बाईकचा मायलेज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बबलूच्या सांगण्याप्रमाणे आधी फक्त सायकलचा सांगाडा होता...तिला ना चाकं होती ना इंजिन...बबलूने त्या सायकलला मोटार बाईक करण्यासाठी एक-एक पार्ट जमा केला...शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरलं जाणारं स्प्रे मशीन तिला जोडलं...बॅटरीही लावली..आणि मग तयार झाली भुंगा बाईक...आता तुम्ही म्हणाल की ही भुंगा बाईक का? तर, ग्रामीण भागात शेतात कीटकनाशक फवारणीच्या यंत्राला भुंगा मशीन असंही म्हणतात...ते या सायकल कम मोटार बाईकला  लावण्यात आल्यानं बबलू आणि त्याचे सहकारी तिला भुंगा बाईक म्हणतात... पेट्रोलवर चालणारी ही भुंगा बाईक ५०चं मायलेज देते असा बबलूचा दावा आहे...आणि बनवायला खर्च आला फक्त तीन हजार रुपये..


किती वजन उचलणार


या भुंगा बाईकला ब्रेक आहेत, हॉर्न आहे आणि इंडिकेटर लाईट्सही आहेत. इतकंच काय वजनालाही हलकी आहे...त्यावर ६० किलोपर्यंत भार ती घेऊ शकते...आणि तिला दुमडून तुम्ही कुठेही नेऊ शकता, अगदी घरातही ठेऊ शकता...या बाईकने तुम्ही स्टंटही करू शकता.


गावाबाहेरही या भुंगा बाईकची चर्चा


माळीवाड्यात हायवेला लागून शेख बबलू आणि त्याच्या वडिलांचं गॅरेज आहे...लहानपणापासूनच बबलूचा अभ्यासापेक्षा मोटारबाईक दुरुस्त करण्याकडेच जास्त ओढा होता...त्यानं त्याच्या आजी-आजोबांसाठी शोले स्टाईल एक स्कुटरही तयार केलीये..त्या स्कुटरची गावात खूप चर्चा झाली होती..मोटारबाईक दुरुस्त करण्याच्या कामात बबलूचा आता चांगलाच हात बसलाय...त्यातून तो भुंगा बाईकसारखे अनोखे प्रयोग करत असतो...त्यानं मोटार बाईक दुरुस्तीचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये...वडिलांचं गॅरेज हीच त्याची शाळा आहे. सध्या गावात आणि गावाबाहेरही या भुंगा बाईकची चर्चा आहे...तिला सिटी बाईक नाव देणार असल्याचं बबलू सांगतो..