औरंगाबाद : गुटख्याचं चमकणारं पाकीट तोंडात टाकण्यापूर्वी ही बातमी वाचा. गुटखा खाणं आरोग्यास अपायकारक असतं अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं. राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही अनेक जण चोरीचुपे मार्गाने गुटख्याची विक्री करतात, आणि गुटख्याचे शौकीन आपली हौस भागवण्यासाठी ते जास्त किंमत देऊन विकतही घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण गुटख्याचा हाच नाद एका एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. गुटखा खाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. गणेश जगन्नाथदास वाघ असं या मृत तरुणाचं नाव आहे. 


गणेशला गुटखा खाण्याचा नाद होता. दोन दिवसांपूर्वी गणेश आपल्या मालकाच्या घरी टीव्हीची डिश बसवण्याचं काम करत होता, पण त्याआधी त्याने तोंडात गुटखा टाकला होता. गुटखा खाता खाताच तो काम करत होता. पण काम करत असतानाच त्याला अचानक जोराचा ठसका लागला. तो अस्वस्थ झाला, त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला. 


मालकाच्या घरातील लोकांनी गणेशला तात्काळ औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला होता. 


शवविच्छेदानाच्या अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर
गणेशच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण समोर आलं,  गुटखा खाल्याने गणेशला ठसका लागला, त्यामुळे गुटख्यातील सुपारी त्याच्या श्वसननलिकेत अडकली आणि त्यामुळे त्याचा श्वास कोंडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानपूरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


गणेशच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. गणेशच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.