विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत पोलिसांनी एका स्पावर धाड टाकली त्याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचं पुढं आलंय. त्यात पोलिसांनी तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. हा सगळा प्रकार मानवी तस्करीशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या माध्यमातून आता पोलिसांचा तपास सुरु आहे.


९ मुली ताब्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यात एका मोठ्या मॉलमधील स्पा वर पोलिसांनी छापा मारला. त्यात देह व्यापार करणा-या ९ मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धक्कादायक म्हणजे या मुली, थायलंडवरून इथं आल्याचं उघड झालंय. या मुलींकडे वर्क व्हिजा देखील नाही. केवळ टुरिस्ट व्हिजावर त्या शहरात आल्या. नियमात असूनही पोलिसांना याची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. अत्यंत गुप्तपणे मॉलमागेच या मुलींसाठी एक आलिशान बंगला भाड्यानं घेण्यात आला होता. त्यातून एका छोट्या रस्त्यानं या मुलींचा थेट मॉलमध्ये प्रवेश व्हायचा आणि गोरखधंदा चालायचा. 


थायलंडवरून मुलींना आणले 


बँकॉक वरून मुलींना आणण्यासाठी एजंटची फळी कार्यरत आहे. हे एजंट थायलंडमधील ग्रामीण भागात रोजगाराच्या शोधात असलेल्या मुलींना शोधतात. त्यांना भारतात मोठा रोजगार आणि त्यातून चांगले पैसेही मिळतील असं आमिषही दाखवलं जातं. त्यातून अशा मुलींचा ग्रुप तयार केल्यावर भारतातले एजंट स्पा मालकांसोबत संधान साधतात आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून मुलींना भारतात आणण्यात येतं. मुली स्पापर्यंत पोहोचवण्याचं काम एजंटचं आणि त्यापुढील काम स्पा मालकांचं असा या धंद्यातील नियम आहे.


खोटं सांगून मुलींची फसवणूक


धक्कादायक म्हणजे पोलिसांनी मुलींचा जबाब घेतला त्यात त्यांना फक्त मसाजचं काम करायचं आणि त्यातून चांगला पगार मिळेल असं सांगण्यात आलं होतं. या मुलींचे पासपोर्ट सुद्धा स्पा मालकाकडे जमा असतात. या मुलींना बाहेर जाण्यास पूर्ण मनाई असते. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचं पोलीस सांगतायत. 


खोटे पासपोर्ट बनवतात


औरंगाबादेत तपासात यातल्या दोन मुलींकडे खोटे पासपोर्ट असल्याचं पुढं आलंय म्हणजे हे रॅकेट चालवणारे खोटे पासपोर्ट बनवतात हे सुद्धा स्पष्ट होतंय. त्याचबरोबर त्यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीनं दरवाजे सुद्धा तयार करण्यात आलेत म्हणजे फक्त स्पामध्येच नाही तर घरीही हा प्रकार चालायचा. औरंगाबादच्या या स्पाचा मालक या ९ मुलींसोबत एकटाच या घरात रहायचा,  या फ्लँटमधून कंडोमची पाकिट आणि काही उत्तेजक औषधीही पोलिसांना सापडली आहे.


उच्चभ्रू परिसर वा तारांकित मॉल स्पाची निवड


खास करून उच्चभ्रू परिसर वा तारांकित मॉल स्पा साठी निवडण्यात येत असल्याचंही आता पुढं आलंय, म्हणजे उच्चभ्रू माणसांची रेलचेल असली की संशयही येणार नाही आणि पोलीसही चार हात लांब असतील. त्यात स्थानिक पोलिसांचा सुद्धा सहभाग यात नाकारता येत नाही, आणि याच माध्यमातून राज्यभरात थांयलंडमधून आणलेल्या या मुलींचे स्पा आणि त्यातून देहविक्री बिनबोभाट सुरुय. औरंगाबाद पोलिसांनी हा सगळा प्रकार समोर आणलाय. किमान आता राज्यात किती ठिकाणी हा गैरप्रकार सुरु आहे याचा सरकारनं शोध लावण्याची गरज आहे.